तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, अनं घात केला…पोलिस उप निरीक्षकांचा प्रताप
छत्रपती संभाजीनगर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक पोलिस ठाण्यात घडला.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका ५७ वर्षीय सुभाष चव्हाण नामक पोलिस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय पीडितेवर वारंवार अत्याचार केला आणि तिची इच्छा नसताना तीन वेळा गर्भपात घडवून आणला. हा प्रकार ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी या काळात घडला.
पीडित तरुणी मार्च २०२५ मध्ये तिचा मोबाईल हरवल्याने तक्रार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेली होती. तिथे कार्यरत असलेल्या पीएसआय सुभाष चव्हाणने मदतीचा बहाणा करून तिचा संपर्क क्रमांक मिळवला.
पुढे मोबाईल सापडला आहे, असे सांगून तिला शहरात बोलावले आणि रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये तिची भेट घेतली. मी पोलिस अधिकारी आहे, तुझे काहीही चुकीचे करणार नाही, असे भासवून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने तिला अहिल्यानगर येथे नेले आणि तिथे बनावट मंगळसूत्र घालून लग्नाची खोटी हमी दिली. या दरम्यान पीडिता तीन वेळा गर्भवती राहिली, मात्र आरोपीने तिला धमकावून तिचा गर्भपात घडवून आणला.
काही दिवसांनंतर पीडितेने पुन्हा लग्नाचा विषय काढला असता आरोपीने तू खालच्या जातीची आहेस, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे म्हणून तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नव्हे, तर आरोपीची पत्नी आणि मुलानेही पीडितेला गाठून बेदम मारहाण केली आणि तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या मारहाणीत पीडितेचा तिसऱ्यांदा गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, पीडितेला मारहाण करणारी त्याची पत्नी आणि मुलगा या तिघांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसीपी सागर देशमुख करत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

