मालकाकडे सोने-चांदीसह ५० लाखांची चोरी करणारा नोकर ताब्यात
भुसावळ, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा: बांधकाम व्यावसायिक असलेल्या घरमालकाकडे सोने चांदीसह तब्बल ५० लाखांचा ऐवज चोरी करत आपल्या गावी पसार होणाऱ्या नोकराला आरपीएफ पथकाने रेल्वे प्रवासा दरम्यान ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील खारघर भागातील बांधकाम व्यावसायीक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (वय२५, मर्णेया, उमरकट, जि.मधुबनी, बिहार) नोकर म्हणून कामाला होता मात्र घरातील सोन्यासह रोकडवर त्याची नजर पडल्यानंतर त्याने शनिवारी मध्यरात्री घरात चोरी केली व पळ काढला. खारघर पोलिसात या प्रकरणी गांधी यांनी तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी हा बिहारकडे पसार होईल ही शक्यता गृहित धरून खारघर पोलिसांनी तपास सुरू केला.
त्यानुसार, भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यावर कसून चौकशी करतांना जनरल डब्यातून प्रवास करणार्या राहूल कामत याला ताब्यात घेण्यात आले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्लेसह आदींच्या पथकाने केली.