माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम ; चार गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज डॉ.दीपक लोखंडे | गुढी पाडवा निमित्त न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद (सन 1990-91 बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी माणुसकीचा आदर्श घालून देणारा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या मित्रपरिवारातील आधारविना असलेल्या चार विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
नशिराबाद येथील या बॅचमधील सवंगड्यांनी एकत्र येत चिरंजीव मानस व मयांक (स्व. संजय बोदडे यांचे जुळे पुत्र), चिरंजीव ज्ञानेश्वर (सेमी इंग्लिश प्रथम वर्ष) आणि कुमारी खुशी (इयत्ता आठवी) या चार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. यामध्ये शालेय फी, गणवेश, वह्या, दप्तर आदी सर्व आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीय परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मानस व मयांक यांचे वडील दिवंगत झालेले आहेत, ज्ञानेश्वर यांच्या आईचे जन्मावेळी निधन झाले असून खुशीचे आई-वडील दोघेही स्वर्गवासी आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमानिमित्त नशिराबाद येथील 19 मार्च 2026 रोजी सावजनिक वाचनालय,नशिराबाद येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.पा. उपाध्यक्ष पंकज महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनोद रंधे, डॉ.प्रमोद अमोदकर, संजय पाटील आणि मनोज नाईक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना चालू वर्षासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या उपक्रमासाठी दीपक ईसाने, अविनाश रणधीर, नितीन तारकस, नरेंद्र बोंडे, विकास येवले, गोकुळ मराठे, किशोर माळी, संतोष देवाग, विवेक बाविस्कर, संजय चौधरी, अनिल झटके, राजेंद्र नारखेडे, पराग चौधरी, नितीन चौधरी, चंद्रकांत फेगडे, प्रवीण रोटे, रमेश रोटे, संजय प्रजापती आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पांढरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागराज महाजन यांनी मानले.
या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी केवळ सामाजिक बांधिलकी जपली नाही, तर माणुसकीचे नाते अधिक दृढ करत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.


