उच्च शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर १० विभागीय सहसंचालकांची नेमणूक
पुणे, मंडे टु मंडे न्युज | उच्च शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील १० विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) व २ सहसंचालक (प्रशासन) या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यासाठी विहित अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छूक उमेदवारांकडून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अर्ज मागवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) व सहसंचालक (प्रशासन) या पदांचे कार्यभार सोपवण्यात आलेल्या उमेदवारांची निवड यादी ४ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करून जाहीर करण्यात आली आहे.
नव्याने अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेल्या विभागीय सहसंचालकांची (उच्च शिक्षण) नावे अशीः
जळगावः जळगावचे विद्यमान विभागीय सहसंचालक डॉ. कपिल सिंघले यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणण्यात आला असून त्यांच्या ठिकाणी मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. पराग पुरुषोत्तम मसराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार छत्रपती संभाजीनगरच्याच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पंकजा माधव वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विद्यमान सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणण्यात आला आहे.
अमरावतीः अमरावतीचे विद्यमान विभागीय सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणून त्यांच्या ठिकाणी नागपूरच्या शासकीय विज्ञान संस्थेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. अभय कमलाकर खांबोरकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोलापूरः सोलापूरचे विद्यमान विभागीय सहसंचालक डॉ. उमेश काकडे यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणण्यात आला असून त्यांच्या ठिकाणी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाची प्राध्यापक डॉ. अजयकुमार गंगाधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेडः नांदेडच्या विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. बाबासाहेब दादासाहेब भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार डॉ. किरणकुमार बोंदर यांच्याकडे होता. तो काढून घेण्यात आला आहे.
पनवेलः पनवेलच्या विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. किरणकुमार बोंदर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आधी त्यांच्याकडे नांदेड विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. पनवेलचे विद्यमान सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आला आहे.
पुणेः पुण्याच्या उच्च शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदाचा (प्रशासन) अतिरिक्त कार्यभार पुण्याच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी डॉ. अर्चना सखाराम बोऱ्हाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. आधी या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रकाश बच्छाव यांच्याकडे होता.
तिघांचा पदभार कायम
मुंबई, नागपूर आणि पुण्याच्या विद्यमान विभागीय सहसंचालकांकडील अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर सहसंचालकपदाचा कार्यभारही (शिक्षण शुल्क समिती) कायम ठेवण्यात आला आहे. नव्याने विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले असून ज्या विभागीय सहसंचालकांकडील अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणण्यात आला आहे, त्यांना मूळ आस्थापनेवरील पदावर रूजू होण्यास सांगण्यात आले आहे.ट्यूशन क्लासेस

