फैजपूर मध्ये सट्टा – मटका जोरात, ‘मटका किंग” पुढे प्रशासन हतबल की सामील?, याना “आशीर्वाद” कोणाचा?
फैजपूर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैध धंद्यांविरोधात आ. खडसेंच्या एल्गार नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या असतानाही “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य नुसार चालणारे फैजपूर पोलीस प्रशासन सध्या नेमके कोणाचे रक्षक बनले आहेत? सज्जनांचे की शहराला मटक्याच्या दलदलीत ढकलणाऱ्या सट्टा बहाद्दरांचे? फैजपूर शहरात सध्या कायद्याचे राज्य नसून ‘मटकाकिंग’ची समांतर सत्ता सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. कोणाच्या आशीर्वादाने आणि अभयाने फैजपूर शहरात सट्टा-मटक्याचा नंगानाच उघडपणे सुरू आहे, तो पाहता खाकी वर्दीची जरब संपली की काय? असा जळजळीत सवाल संतप्त फैजपूरकर विचारत आहेत.
‘हप्तेखोरी’च्या उबदार पाकिटांनी डोळे पांढरे?
शहरातील प्रमुख चौक, गजबजलेल्या वसाहती आणि अगदी पोलीस गस्तीच्या मार्गावरील चहाच्या टपऱ्यांवर लाखो रुपयांची उलाढाल उघडपणे सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांना हे अवैध धंदे उघड्या डोळ्यांनी दिसतात, तेच धंदे पोलिसांना का दिसत नाहीत? हा पोलिसांचा ‘नाकर्तेपणा’ आहे की महिन्याला मिळणाऱ्या ‘उबदार पाकिटांचा’ परिणाम? “वरकमाई” च्या नादात प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून बसले असून, हप्तेखोरीच्या बाजारामुळेच फैजपूरात मटक्याचा बोलबाला वाढला असल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे.
प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस!
पोलीस बंदोबस्त असूनही जर गुन्हेगार इतके निर्भय होत असतील, तर गृहविभागाचा धाकच उरला नाही असे म्हणावे का? दिवसाढवळ्या चालणाऱ्या या सट्टा मटक्याची मटक्याने शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवले असून गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरलेले नाही, कारण त्यांना माहित आहे की “अर्थपूर्ण” तडजोड झाली की कायद्याचे हात आपोआप आखडतात. हा प्रशासकीय नाकर्तेपणा फैजपूरच्या शांततेला सुरुंग लावणारा ठरत आहे. हेच चित्र फैजपूर शहरासह परिसरातील गाव खेड्यांवर सुरू आहे.
खाकीची प्रतिष्ठा की मटकाकिंगची गुलामी?
सामान्य माणसाने साधी चूक केली तर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस या मटकाकिंगसमोर इतके हतबल का होतात? की या मटकाकिंगनी अर्थपूर्ण संबंधातून पोलिसांना आपल्या खिशात ठेवले आहे? जर पोलीस प्रशासन या अवैध सट्टा मटक्याचे समूळ उच्चाटन करू शकत नसेल, तर ….., अशा शब्दांत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.


