भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मुले पळवून नेत असल्याच्या संशयावरून जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ‘मुलं पळवून नेत असल्याच्या संशयावरून एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात सोमवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे शिवारात ‘लक्ष्मी जिनिंग’ परिसरात २३ फेब्रुवारी सोमवार रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण परिसरात वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर सोनवणे यांच्या ३ वर्षीय चिमुरड्याला पळवून नेत असल्याचा संशय काही स्थानिकांना आला. या संशयाचा वणवा इतक्या वेगाने पसरला की, काही वेळातच तिथे मोठा जमाव जमा झाला. जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना पाचारण न करता , कुठलीही विचारपूस न करता संबंधित तरुणावर हल्ला चढवला. संतापलेल्या जमावाने त्याला जमिनीवर लोळवून बेदम मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिली.जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाल्याने मंगळवारी पहाटे ४:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण), प्रशांत उर्फ प्रकाश सोनवणे (रा. बामणोद), अजय उर्फ बादल सोनवणे (रा. बामणोद), अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ) या पाच मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!