मोठी बातमी : श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आता “वस्त्रसंहिता” लागू, भारतीय वेशभूषा असेल तरच मिळणार प्रवेश
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l श्री खंडोबाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड ( वस्त्रसंहिता) लागू करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट ने हा मोठा निर्णय घेतला आहे.आज १० मार्च पासूनच हा ड्रेस कोड लागू केला जात आहे.
आता महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्येही भाविकांसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. यामध्ये भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असणार आहे. श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निर्णयामध्ये पाश्चिमात्य कपडे घालून आलेल्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जेजुरीला येताना फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

सध्या महाराष्ट्रामध्ये ५२८ मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत. मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आमचा उद्देश असून यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
कोणता नवा ड्रेस कोड लागू केलाय जेजुरी खंडोबा मंदिरात?
जेजुरी खंडोबा मंदिरात लागू नवा ड्रेस कोड स्त्री आणि पुरूष दोन्ही भाविकांसाठी लागू असणार आहे. यामध्ये फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट घालून येणार्यांना रोखलं जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे म्हणजेच आखूड-कमी कपडे घालून येणं ट्रस्टला अपेक्षित नाही. भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करावी असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. आज १० मार्च पासूनच हा ड्रेस कोड लागू केला जात आहे.