बँकेच्या भरण्यात निघाल्या पाचशेच्या बनावट नोटा
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. बँकेत भरणा केलेल्या नोटांमध्ये बनावट नोटा निघाल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत बँक व्यवस्थापक शशिकांत वारके यांनी अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलिस स्टेशन मध्ये शुक्रवार ता. ३ मे रोजी तक्रार दाखल केली.
.
मिळालेली अधिक माहिती अशी की, अमरावती शहरात वेगवेगळ्या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते,त्याच प्रमाणे इतर व्यापाऱ्यांसह सुवर्णकार व्यापाऱ्यांची सोने खरेदी विक्रीची बरीच दुकाने आहेत. येथील बडोदा बॕंक शाखेमध्ये बहुतांश व्यापाऱ्यांची खाती असल्याने या बँकेत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तशीच १६ एप्रिल २०२४ रोजी याच भागातील दोन सुवर्णकारासह अन्य एक व्यापारी अशा तिघांनी टप्प्याटप्प्याने २५ लाख रुपये, २५ हजार रुपये तर तिसऱ्या व्यापाऱ्याने ५ हजार रुपये अशा पद्धतीने नोटांचा भरणा बडोदा बॕंक शाखेमध्ये खात्यात केला.
मात्र ज्यावेळी बँकेच्या रोखपालने संपूर्ण नोटा आणि दिवसभराचा व्यवहार तपासला त्यावेळी त्यामध्ये पाचशे रुपयांच्या एकूण २० नोटा म्हणजेच एकूण दहा हजार रुपयांच्या नोटा बनावट असल्याची बाब उघडकीस आली. ज्या व्यापाऱ्याने २५ लाखाचा भरणा केला होता. त्याच्या नोटांच्या बंडाला मध्ये पाचशे रुपयाच्या १४ नकली नोटा आढळल्या. तर २५ हजाराचा भरणा करणाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या नोटांचे बंडलात ३ नकली नोटा तर पाच हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे बंडलमध्ये पाचशे रुपयांच्या ३ नकली नोटा अशा २० नकली नोटा आढळल्याची बाब उघडकीस आली. बँक व्यवस्थापक शशिकांत वारके यांच्या तक्रारी वरून खोलापुरी गेट पोलिस स्टेशन मध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.