मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार, ही तर विजयाची सभा,– पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज चमू | राज्यभरात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा धुराळा उडताना दिसत आहेत. या निवडणुकांना राज्यातील मातब्बर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जावून सभा घेत आहेत. त्यात नेहमी प्रकाश जोतात असलेल्या मुक्ताईनगरमध्ये त् निवडणुकीला विशेष रंगत आलेली बघायला मिळत आहे. स्थानिक आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष बघायला मिळत आहे. या संघर्षादरम्यान रविवारी प्रचारसभेत भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार विश्वास व्यक्त केला.
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आम्ही मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहोत. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहणे हे स्व.गोपीनाथ मुंडे व भाजपाचे संस्कार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे सांगत नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या सर्व उमेदवारांना अधिकाधिक मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. जेडीसीसी बँकेजवळ रविवार, 30 रोजी दुपारी त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपामुळेच मुक्ताईनगराचा विकास
पर्यावरण मंत्री.पंकजा मुंडे यांनी पंतप्रधानांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत भाजपामुळे मुक्ताईनगरचा विकास झाल्याचे सांगितले. मंत्री रक्षा खडसे यांच्या कार्याचा त्यांनी यावेळी विशेष गौरव केला व भाजपाचा उमेदवारांचा निश्चितपणे येथे विजय होईल, असा आशावादही यावेळी व्यक्त केला.
व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ.राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, डॉ.केतकी पाटील, मधुकर राणे, तालुकाध्यक्ष जयपाल बोदडे, नजमा तडवी, मोहन महाजन, असगर खान पठाण, मनोहर खैरनार, विनोद पाटील, राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाणे, अतुल महाजन, पंकज कोळी, उमेश कोळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


