प्रकल्प ग्रस्त असल्याचा चौकशी अहवाल दाखला देण्यासाठी दोन हजारांची लाच, मंडळाधिकाऱ्याला अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळण्यासाठी आलेल्या अर्ज चौकशीचा अहवाल तहसीलदारांना देण्यासाठी तडजोडीअंती दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील तामथरे मंडळाधिकाऱ्याला धुळे एसीबीने अटक केली. ही कारवाई शुक्रवार, २० रोजी सायंकाळी करण्यात आली. छोटू महादू पाटील. मंडळ अधिकारी, भाग तामथरे, ता. शिंदखेडा, जि. धुळे. (५४, रा. प्लॉट. नं.३१/ब, गीता नगर, देवपूर) असे अटकेतील मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या वडीलांच्या नांवे मौजे सोंडले, ता.जि. धुळे येथील शेतजमिन सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली आहे. तकारदार यांना नोकरी मिळविणेकामी प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), धुळे यांचेकडे दि.२८.०२.२०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी तहसिलदार, शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यात येवुन त्यांनी सदरचा अर्ज पुढील चौकशीकामी छोटु पाटील, मंडळ अधिकारी, भाग तामथरे यांचेकडेस दिला होता.
त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी छोटु पाटील यांची वेळोवेळी भेट घेवुन त्यांनी सांगितल्या प्रमाणे अर्जाच्या चौकशीकामी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन दिली होती. परंतु मंडळ अधिकारी छोटु पाटील यांनी त्यांच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.१८.०६.२०२५ रोजी मंडळ अधिकारी छोटु पाटील यांची चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचा अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यासाठी तकारदार यांच्याकडे ३,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दिली होती सदर तकारीची दि.१९.०६.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी छोटु पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या `प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणेबाबतच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्याकरीता तडजोडीअंती २,०००/- रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर दि.२०.०६.२०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी छोटु पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन २,०००/- रुपये लाचेची रक्कम चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात स्विकारतांना छोटू महादू पाटील. मंडळ अधिकारी, भाग तामथरे, ता. शिंदखेडा, जि. धुळे. (५४, रा. प्लॉट. नं.३१/ब, गीता नगर, देवपूर) यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे यांनी केली.

