ब्रेकिंग : एस टी बस उलटली, एका प्रवाशाचा मृत्यू, ५० हून अधिक प्रवासी जखमी
जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज शुक्रवार दिनाक १ ऑगस्ट रोजी सकाळी एरंडोल-कासोदा मार्गावर भीषण अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एरंडोल-भडगाव मार्गावर MH २० BL ३४०२) एस.टी. बस वरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, ५० प्रवासी जखमी झाले असून त्यातून सुमारे १५ प्रवासी गंभीर जखमी आहेत. इतर ३५ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत .
सदर घटनेची माहिती मिळताच काही वेळातच मदतकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन पद्धतीने कामकाज राबवत जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

