चालत्या गाडीत मेव्हण्याचा दोन वेळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार,आरोपी मोकाट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बुलडाणा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मेव्हण्याने चालत्या गाडीत दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात उघडकीस आली होती. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने बाजारात जात असताना मेव्हण्याने बळजबरीने तिचं तोंड दाबून तिला गाडीत बसवलं. त्यानंतर चालत्या गाडीतच तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. या संदर्भात आरोपी मेव्हण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आज महिना उलटला, तरीही तो मोकाटच असलयाने चिखली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर पीडित कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
काय आहे प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील माळीपुरा परिसरातील 17 वर्षीय मुलीचा 25 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. जालना येथील तिचा मोठ्या बहिणीचा नवरा तिच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे सासऱ्यांकडे आला. पीडित मुलगी म्हणजेच मेव्हणीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून कपडे घेऊन देतो, असं सांगत तिला कपड्याच्या दुकानात घेऊन गेला.
नेमकं काय घडलं?
त्या ठिकाणी आरोपीने तिला कपडेही घेतले, मात्र मेव्हणीला घरी न सोडता त्याने आधीपासूनच जुन्या मेहकर रोडवर उभ्या असलेल्या गाडीत तोंड दाबून बळजबरीने टाकले आणि जालन्याकडे घेऊन गेला. यावेळी मेहुण्याने चालत्या कारमध्येच अल्पवयीन पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. याची तक्रार पीडितेने चिखली पोलिसांत करुन आज महिना उलटला, तरीही आरोपी मेव्हणा मोकाटच असल्याने पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
महिन्याभरानंतरही कारवाई नाही
घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडितेने आपल्या आई-वडिलांसह चिखली पोलीस स्टेशन गाठून आपल्या मेव्हण्याविरुद्ध आणि त्याला सहकार्य करणाऱ्या गाडी चालकाविरुद्ध तक्रार दिली होती. पोलिसांनी 363, 366 अ, 376, 109, 102 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीवर गुन्हा दाखल होऊन आज एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही आरोपी अद्यापही मोकाटच आहे.
मुस्लिम सेवा संघाने या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा आणि आरोपीला पकडून त्याला कठोर शिक्षा द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन मागणी केली. पोलीस म्हणतात की आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई सुरु आहे, मात्र घटनेला महिना उलटला तरीही आरोपी मोकाटच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.