किरकोळ कारणावरून पुजाऱ्यास मारहाण : बापलेकावर गुन्हे दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन :
मलकापूर, (संकेत पवार) : माकनेर येथील मंदिरावर पुजारी म्हणून सेवा देत असलेल्या धोरण कुटुंबाला येथीलच घनशाम राजेंद्र ढोले , राजेंद्र ढोले तसेच मंदाकिनी राजेंद्र ढोले यांनी सकाळी मारहाण केली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी सौ सुधा श्रीकृष्ण धोरण यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत .
याबाबत अधिक असे, श्रीकृष्ण धोरण हे आपली पत्नी , मुलेबाळे व आईवडीलांसह माकनेर येथे मंदिरावर पुजारी म्हणून सेवा देतात . मंगळवारी सकाळी नित्यनेमाने ते मंदिराची कामे करीत असतांना मंदिरासमोरच शेजारील घनशाम ढोले याने | सोयाबीन वाळत घातले त्यामुळे मंदिरात जाण्याचा रस्ताच बंद झाला . त्यामुळे श्रीकृष्ण धोरण तसेच पत्नी सौ सुधा धोरण यांनी घनशाम ढोले याला सोयाबीन मुळे मंदिरात प्रवेश करता येत नाही त्यामुळे सोयाबीन बाजूला करण्यास सांगितले असता घनशाम ढोले याने श्रीकृष्ण धोरण व त्यांची पत्नीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. अशातच घनशाम ढोले याचे वडील राजेंद्र ढोले व आई सौ मंदाकिनी ढोले यांनीही आपल्या मुलाचे समर्थन करत श्रीकृष्ण धोरण व त्यांच्या पत्नीस मारहाण केली तसेच जीव मारण्याच्या धमक्या दिल्या.
घनशाम ढोले व राजेंद्र ढोले याच्या मारहाणीत जखमी झालेल्या सौ सुधा श्रीकृष्ण धोरण यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत घडलेली घटना पोलिसांना सांगितली . त्यानुसार घनशाम राजेंद्र ढोले , राजेंद्र उद्भव ढोले , सौ मंदाकिनी राजेंद्र ढोले याच्याविरुद्ध भादवी कलम २ ९ ४ , ३२३ , ५०६ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार मिजी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस अधिकारी पोलाखरे करीत आहे .