भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल, तर दोन रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन महत्वाच्या गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. गोरखपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या देखभाल व दुरुस्ती कामामुळे मध्य रेल्वेतर्फे गोरखपूरकडे जाणाऱ्या दोन गाड्यांच्या मार्गात हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूरदरम्यान धावणारी गोदान एक्स्प्रेस आता ७ डिसेंबर २०२५ पर्यंत गोरखपूर ऐवजी गोंडा येथे पोहोचेल व तेथूनच सुटेल. क्र. ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सकाळी १०.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता गोंडा येथे पोहोचेल. तसेच क्र. ११०५६ गोंडा येथून रात्री ३.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूरदरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस ही ५ व ६ डिसेंबर २०२५ पर्यंत गोरखपूरऐवजी आझमगडपर्यंत चालविण्यात येणार आहे. क्र. २०१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ५.२३ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १५.१५ वाजता आझमगड येथे पोहोचेल आणि क्र. २०१०४ ही गाडी आझमगड येथून संध्याकाळी १८.५० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या तात्पुरत्या बदलानुसार प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची व वेबसाइटची खात्री करून प्रवास करावा, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
तसेच भुसावळ मार्गे धावणाऱ्या आणखी दोन रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे भुसावळूहुन मुंबईकडे जाण्यासाठी येण्यासाठी या गाडीचा फायदा होणार आहे.
रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दोन्ही रेल्वेंना आता मुदतवाढ देण्यात आली आहे. रिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुरू करण्यात आलेली साप्ताहिक रेल्वे (०२१८७) ३ जुलैपर्यंत चालवली जाणार होती. मात्र ही गाडी आता २५ सप्टेंबर पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष रेल्वे (०२१८८) ४ जुलै पर्यंत चालवली जाणार होती. मात्र आता ही गाडी २६ सप्टेंबर पर्यंत चालवली जाणार आहे. या गाड्यांना दादर, कल्याण, जंक्शन, नाशिक रोड, मनमाड, भुसावळला थांबा आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

