जळगावात जोडप्याचा कारनामा : एकनाथ शिंदे यांचा पीए असल्याचे सांगत बंटी-बबलीने घातला २२ जणांना गंडा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव मधील एका जोडप्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचं सांगून जळगाव मधील २० ते २२ जणांची तब्बल ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस तपासात आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हितेश रमेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता हितेश संघवी या बंटी – बबली जोडप्याने रेल्वेत नोकरी लाऊन देतो, म्हाडामध्ये फ्लॅट देतो, रेल्वेत टेंडरचे काम करून देतो अशी वेगवेगळे काम करून देण्याचे आमिष दाखवून २२ जणांना तब्बल ५५ लाख ६० हजारांना लुबाडले आहे. हे रुपये काहींनी दागिने मोडून तर काहींनी उसनवारी, कर्जाचे घेऊन तर काहींनी नातेवाईकांकडून आणून याना दिले होते.
याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला हितेश रमेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता हितेश संघवी या दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हा शाखेकडे
गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे.
हितेश रमेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता हितेश संघवी या दाम्पत्याने तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून बनावट लेटरपॅड, बनावट ओळखपत्र तसेच बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून रेल्वेत टी सी ची किंवा इतर नोकरी लाऊन देतो, म्हाडामध्ये फ्लॅट देतो, रेल्वेत टेंडरचे काम मिळवून देतो. अशी आश्वासने देत विश्वास संपादन करून
लाखो रुपये लाटले.
मात्र लाखो रुपये देऊनही कुठलेच काम झाले नाही. तगादा लावला, पैसे परत मागितले तरीही कुठलाच फरक पडला नाही. नेहमीच फोन वरून दोघे पती पत्नी उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांनी नंतर फोनही बंद करून टाकला. आणि संपर्कच तुटला.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या लोकांनी आपली फसवणूक झाल्याची व्यथा मांडत तक्रार केली. आम्ही कसेतरी पैसे जुळवून याआमच्या नोकरी लावून देण्याच्या आश्वासनाने या जोडप्याला लाखो रुपये दिले. मात्र आमची फसवणूक झाली. आमच्या भावनांशी खेळणाऱ्या या जोडप्याला पोकडून आमचे सर्व पैसे आम्हाला परत मिळवून देण्याची विनंती पोलिसाना केली.
या दाम्पत्याने नोव्हेंबर २०२४ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार राबवला. यात हर्षल शालिग्राम बारी या व्यक्तीकडून एकट्याकडून १३ लाख ३८ हजार रुपये, तर उर्वरित लोकांकडून मिळून ४२ लाख २२ हजार रुपये उकळले. हा संपूर्ण आर्थिक व्यवहार जळगावमधील कालिका माता मंदिर परिसरातील दूध डेअरीमध्ये पार पडल्याचे उघड झाले आहे
या प्रकरणी जळगाव येथील शनिपेठ पोलिस स्टेशनला हितेश रमेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता हितेश संघवी या जोडप्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या संघवी जोडप्याने आणखी इतर लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

