धोनीच्या निवृत्तीवर मुंबई इंडियन्सनं ट्विट केलं बोलकं चित्र, चाहत्यांची जिंकली मनं !
मुंबई। अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. पण, धोनी किमान 2020 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल आणि मानानं निवृत्ती घेईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण, त्या चर्चाच राहिल्या. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीनं मैदानाबाहेर घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं.
मुंबई इंडियन्सनं एक फोटो पोस्ट केला. त्यात 2007साली धोनी टीम इंडियात दाखल होताना दिसत आहे आणि तेव्हा भारतीय संघानं एक चॅम्पियन्स ट्रॉफी, एक वर्ल्ड कप आणि चार आशिया चषक जिंकलेले दिसत आहेत आणि टीम इंडियाची दिवाळ ढासळताना दिसत आहे. पण, 2020मध्ये जेव्हा धोनी बाहेर पडतो तेव्हा… पाहा तुम्हीच..
”माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार… 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,”धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.