हॉटेलातील भांडणाचा राग : तरुणांच्या डोक्यात फरशी मारून खून !
Monday To Monday NewsNetwork|
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : सिडकोतील स्टेट बँक चौकातील चौपाटीजवळच काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फरशीच्या तुकड्याने डोक्याला जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पगारे बागवानपुरा येथील जुन्या घरी गेले असता तेथे त्यांचा मित्र आकाश दादू गांगुर्डे तेथे भेटला. त्यावेळी त्यांच्याच चर्चा होऊन हॉटेलमध्ये जेवणाचा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे आकाश गांगुर्डे, युवराज वाडिले, क्रिश शिंदे व आशिष साळवे हे सर्व मित्र एमएच 15 जीएक्स 3467 या क्रमांकाच्या कारमधून सिडकोतील स्टेट बँक चौकात असलेल्या सोनाली मटण भाकरी या हॉटेलकडे जात होते. काठे गल्लीतील सिग्नलवर आकाश गांगुर्डे यांचे मित्र आनंदा जाधव व प्रसाद भालेराव हे त्यांना भेटले. त्यांना घेऊन जेवण करण्यासाठी सोनाली मटण भाकरी येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास गेले. यावेळी 18 ते 19 वर्षांचा क्रिम रंगाचा फुलबाहीचा शर्ट घातलेला तरुण म्हणाला, की तुम्हाला काही पाहिजे आहे का? यावेळी “काही नाही पाहिजे,” असे त्यांनी उत्तर दिले. यावेळी प्रसाद याने “तू हॉटेलचा मॅनेजर आहेस काय?” अशी विचारणा केली. यावेळी तो म्हणाला, की “होय. मी मॅनेजर आहे. तुझे काय म्हणणे आहे?” अशी शाब्दिक चकमक त्यांच्यात सुरू झाली.
रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सर्व मित्रांचे जेवण झाल्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येत असताना रस्त्यात हॉटेलमध्ये ज्या व्यक्तीने वाद घातला होता, ती व्यक्ती व त्याचे साथीदार तेथे भेटले. त्यांनी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून प्रसादला मारहाण सुरू केली. यावेळी प्रसाद सोनाली मटण भाकरीच्या दिशेने पळत असताना सर्वांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. प्रसाद पुन्हा शनी मंदिराच्या दिशेने पळत गेला. यावेळी तो रोडवर खाली पडला. त्याच वेळी हॉटेलमध्ये सुरुवातीला ज्याने वाद घातला होता, त्याच व्यक्तीने प्रसादच्या डोक्यात रोडवर पडलेली फरशी मारली. या घटनेत तो रक्तबंबाळ झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत झालेला प्रसाद भालेराव हा देवळाली गाव येथील रहिवासी आहे. अंबड पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही वेळातच जुने सिडकोतील लेखानगर वसाहतीत राहणार्या अनिल दशरथ पाटेकर ऊर्फ गिन्या याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे. यातील दुसरा संशयित नितीन दांडेकर मात्र फरारी झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 302, 141, 143, 147, 148, 149, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.