कोरोना दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार– WHO च्या अध्यक्षांचं वक्तव्य
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली: वृत्तसंस्था। देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असून परिस्थिती अधिक गंभीर झाली असतांना ‘चीनमधून उगम पावलेली आणि संपूर्ण जगात पसरलेली कोरोना विषाणूची महासाथ नजीकच्या भविष्यात तरी संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार असून लसीकरणाबरोबरच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हेच तूर्तास आपल्या हाती आहे’, असे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेस्युस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
कोरोनाचे वास्तव्य दीर्घकाळपर्यंत राहणार असून त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही म्हटले आहे. तसेच जगभरात आतापर्यंत ७८ कोटी लस नागरिकांना देण्यात आल्या असल्या तरी देखील कोरोनाचा उद्रेक होताना दिसतोय. सलग सात आठवडे कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सलग सहा आठवडे कोरोना फैलावाचा आलेख हा खाली आला होता. दरम्यान, कोरोना लसीबद्दल बोलताना ते म्हणाले,’अनेक आशियाई तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. जगभरात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी केवळ लस हाच या महासाथीवरील एकमेव उपाय आहे.’ तर कोरोनातून बरे झालेल्यांवर या विषाणूचे दीर्घकालीन परिणाम संभवताना दिसताय. काही लोकांमध्ये या आजाराविषयी कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही. तरूणांमध्ये कोरोना आपल्याला होणारच नाही असा त्यांचा भ्रम असल्याने काळजी घेणे अधिक योग्य असल्याचेही टेड्रोस घेब्रेस्युस यांनी सांगितले.
देशात गेल्या २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८५ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण १ कोटी ३८ लाख ७३ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली यासह देशात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असून फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० ते १३ हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. मात्र फेब्रुवारीपासून दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे.