आधी आमदारकीचा राजीनामा दया, मग भाजपच्या प्रचारात या; गिरीश महाजनांची नाथाभाऊवर टीका
शिर्डी, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून देण्याचं आवाहन खडसे करत आहेत.
मात्र, खडसेच्या या कृतीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न देता भाजपचे काम करत असल्याने लोकांमध्ये गैरसमज होत आहे, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना सुनावले आहे.
गिरीश महाजन शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधत असताना त्यांनी नाथाभाऊंना लक्ष केलं. एकनाथ खडसे कधी महणातात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.