गोपीनाथ गटातील सर्व जण मी असो की पंकजा… बाजूला पडले : आ. एकनाथ खडसे
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अपूर्ण आहे. पुढच्या काही काळात तो पूर्ण होईल. मात्र सध्याचा विचार केला तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) असोत की गोपीनाथ मुंडे परिवाराशी निगडित आणखी कोणी असो, या सगळ्यांवर सातत्याने अन्याय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशी खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
खडसें बोलतांना म्हणाले, ओबीसी नेत्यांना डावलण्यात आल्याचे अनेक प्रकार नेहमीच घडले आहे. त्यातही जे कोणी गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे होते, मग त्यात मी आहे, पंकजा मुंडे आहेत, हे सर्व जण बाजूला पडले आहेत. पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल किंवा नाही याबाबत मला शंका वाटत आहे. मात्र त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी जास्त वाट न पाहता आपल्या वरिष्ठांना भेटावे. मंत्रिपदासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीवर त्यांना सल्ला दिला आहे.
पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि खासदार प्रितम मुंडे यांचे नाव आधी केंद्रीय मंत्रिपदाच्या यादीतून वगण्यात आले. त्यानंतर स्वतः पंकजा मुंडे यांचा विधानपरिषदेच्या उमेदवार यादीत समावेश करण्यात आला नाही. आता त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतही घेण्यात आले नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांत नाराजी आहे. काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपद न मिळाल्यावरुन जाहीर खंत व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिला नसेल आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते देतील. माझं यावर काहीच म्हणणं नाही, राज्यात ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. आज रक्षाबंधन असल्याने राजकीय बोलणार नाही असेही मुंडे म्हणाल्या होत्या.