एसटी लिपिक भरतीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मागणी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव विभागातील लिपिक_टंकलेखक पदोन्नती संदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जळगाव सुरक्षा व दक्षता खाते मार्फत चौकशी सुरू आहे. तक्रारदारांच्या तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य असल्याचे जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
यासंदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समिती जळगांव यांची महत्त्वपूर्ण बैठक गणेश कॉलनी येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश चांगरे हे होते. या बैठकीत भ्रष्टाचाराशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पदोन्नती संदर्भातील तक्रारदारांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्याबाबत, तसेच पदोन्नती गैरव्यवहाराशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याबाबत मांडलेल्या आवाजी ठरावाला सार्वमताने मंजुरी देण्यात आली.त्याच प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटल्यामुळे त्यांचा अभिनंदनचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
सर्वसामान्य चालक वाहक मेकॅनिक यांचेवर जर अन्याय होत असेल तर त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन याप्रसंगी दिलीप सूर्यवंशी यांनी केले. सर्वसामान्य कर्मचाऱ्याकडून चूक झाली तर तात्काळ कारवाई केली जाते परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चूक झाल्यानंतर विलंब का लागतो असा सवाल प्रकाश ठाकरे यांनी उपस्थित केला. याप्रसंगी समितीकडून अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेऊन त्यांना राज्य परिवहन जळगाव विभागातील भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्वश्री सुरेश चांगरे (अध्यक्ष), प्रकाश ठाकरे (कार्याध्यक्ष), दीपक चौधरी (उपाध्यक्ष), दिलीप सूर्यवंशी (सचिव), पांडूभाऊ सोनवणे (सहसचिव), अमृत पाटील (सहसचिव), सुनील बडगुजर (खजिनदार), गोपाळ पाटील (प्रसिद्ध सचिव), प्रभाकर सोनवणे (संघटक सचिव), यशवंत फेगडे (सल्लागार) आर के पाटील (सल्लागार) आधी उपस्थित होते.