अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव, १० जणांचा होरपळून मृत्यू
अहमदनगर, प्रतिनिधी : दिवाळीत भाऊबीजच्या दिवशीच अहमदनगर जिल्हा रूग्णालयात शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. रूग्णालयातील आयसीयू विभागात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतानाच जिवितहानी झाल्याची माहितीही समोर आली आहे. याठिकाणी बराचवेळ अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू होते. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असून याठिकाणी रूग्णांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. मुख्यत्वेकरून आयसीयूमधील रूग्णांचे स्थलांतरण करण्यात येत आहे.
अनेक वेंटीलेटरवर असणाऱ्या रूग्णांना प्राधान्याने हलविण्यात आल्याची माहिती आहे. आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकुण दहा जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आगीमध्ये १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. आग लागल्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. आग लागण्यासाठी प्राथमिक कारण म्हणजे शॉर्ट सर्कीट झाल्याची माहिती आहे. आगीमध्ये आयसीयूची मशिनरी मोठ्या प्रमाणात जळाल्याची माहिती आहे. आयसीयू कक्षामध्ये एकुण २० रूग्ण उपचार घेत होते. त्यापैकी बारा जण आगीत भाजल्याची माहिती आहे. जिल्हा रूग्णालय असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात रूग्णांची वर्दळ असते. सकाळी अकराच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. आगीच्या घटनेमध्ये आयसीयू कक्षातील दहा जणांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. तर दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याठिकाणी बचाव कार्यात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या. तर दहा जणांना आयसीयूमधून सुरक्षित स्थलांतरीत करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आयसीयू युनिटमध्ये कोविडचे १७ पेशंट होते. याठिकाणी लागलेल्या आगीत १० पेशंटचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृत रूग्णांचा पंचनामा सुरू आहे.
या दहा जणांचे मृत्यू नेमके कोणत्या कारणाने झाले याचीही पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. तसेच या रूग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते का ? हेदेखील तपासण्यात येणार आहे. तसेच फायर ऑडिटसाठीच्या सूचनाही देण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात लागलेली भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी असून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विट करून केली आहे.