जळगाव मध्ये पुन्हा गोळीबार, तरुणाचा मृत्यू, तीन तरुण जखमी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कांचन नगर भागात दोन गटांमधील वादाचे पर्यावसान गोळीबारात झाले. रात्री कांचन नक्षरातील विलास चौकात आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर कोळी यांच्यात शाब्दीक वाद झाले. यानंतर आकाश सपकाळे तसेच त्याच्या सोबत असलेल्या करण उर्फ तांडव राजपूत या दोघांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळीबार सुरू केला.
या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर या तरूणाला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तथापि, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. तर, या गोळीबारात गणेश रवींद्र सोनवणे, तुषार रामसिंग सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या परिसरात अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याला काही दिवस उलटत नाही तोच जळगाव शहरात पुन्हा गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसर हादरला आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे अधोरेखीत झाले आहे.
दरम्यान, गोळीबाराची घटना माहित पडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. डीवायएसपी नितीन गणापुरे, एलसीबीचे निरिक्षक राहूल गायकवाड यांनी तात्काळ त्ोथे भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. रात्री उशीरापर्यंत याबाबत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमागील नेमके कारण काय, कोणत्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले आणि आरोपींची अटक झाली आहे की नाही याबाबत तपास सुरू आहे

