५६ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस १५० फूट दरीत कोसळली, दोन विद्यार्थी जागीच ठार,१८ जखमी
चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | विद्यार्थ्यांना दिवाळी च्या सुटीनंतर घेण्यासाठी गेलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानीत आश्रमशाळेतील स्कूल बसला आंमलीबारी घाटात मोठा अपघात झाला. बस घाटातील एका वळणावरून अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याची माहिती मिळत असून स्कूल बस १०० ते १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाल्याचे वृत्त असून १८ विद्यार्थी जखमी आहेत त्या पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे अनुदानीत आश्रमशाळा असून त्यात तळोदा व अक्कलकुवा भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र विद्यार्थी दिवाळीच्या सुटी निमित्त मूळ गावी आले होते. मात्र सुट्टी संपल्याने या आश्रमशाळेच्या दोन बस विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी मूळ गावी म्हणजेच अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील विविध गावांतून विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या.
विद्यार्थ्यांना घेऊन दोन खाजगी स्कूल बस देवगोई घाटातून परतत असताना या दोन बस पैकी खाजगी स्कूल बस क्र.एम. एच. १५, ए.के, १४५९ या बसला अपघात होऊन ती बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली.अपघात इतका भीषण होता की, बस थेट खडकांवर आढळली. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजे च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार जगदीश बहादूरसिंग तडवी (इयत्ता २ री, रा. निबीपाडा), कपिला जाहागीर राऊत (इयत्ता ७ वी, काठी) या दोन विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला असून १८ विद्यार्थी जखमी झाले आहेत.दोघांची प्रकृती गंभीर आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विद्यार्थ्यांच्या पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जात असल्याचा आरोप करत पालकांनी शाळा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचाही गंभीर आरोप संतप्त पालकांनी केला आहे.
