ऐनपुर परीसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची टोळी सक्रिय
ऐनपुर, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज. विजय के अवसरमल | ऐनपुर परीसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असून संबंधित अधिकारी यांचे याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. ऐनपुर परीसरात डेरेदार वृक्षांची कत्तल होत आहे. यामध्ये निंब, चिंच, बाभूळ आदी वृक्षांचा सामावेश असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी मध्ये संताप व्यक्त केला जात आहे होणाऱ्या वृक्षतोड मागे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर परीसरातून वृक्षांची कत्तल करून कुठलीही परवानगी नसतांना रोज चार ते पाच ट्रक भरून बेकायदेशीर रीतीने मध्यप्रदेशात वाहतूक केली जात आहे. रावेर येथील वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या सोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
वृक्ष तोड करणाऱ्यांकडून असे सांगितले जाते की, आम्ही हप्ता देतो, म्हणून आमचे ट्रक किंवा तोडलेले वृक्ष अधिकारी पकडू शकत नाही. परीसरात वृक्षतोड जास्त प्रमाणात होत असून यामुळे पर्यावरण धोक्यात आणण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. शासन वृक्ष लागवड करण्यासाठी कोटी रुपये खर्च करीत आहे. मात्र अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्रासपणे वृक्षतोड होत आहे. याकडे राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परीसरातील वृक्ष प्रेमी मधून होते आहे