गॅस सिलेंडर महागला, सर्वसामान्यांना झटका
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. पण बजेट सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसाल. आता लोकांना LPG गॅस सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. देशातील प्रमुख ऑईल मार्केटिंग कंपन्या IOC, HPCL आणि BPCL ने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.
रविवार १ फेब्रुवारी पासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. या किंमती स्थिर आहेत.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १ फेब्रुवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात ४९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने व्यावसायिक, हॉटेल-रेस्टॉरंट मालकांनी चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा सिलेंडरच्या किंमतीत १११ रुपयांची वाढ झाली होती. दुसरीकडे १४.२ किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
प्रमुख शहरातील किमती
कोलकत्तामध्ये १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता १,८४४.५० रुपये, तर मुंबईत हे सिलेंडर १६९२.०० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत या किंमती सर्वात महाग आहे. याचा भाव चेन्नईत १८९९.५०रुपये इतकी आहे.

