यावल शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन
६.५ कि.मी. रस्त्यासाठी १४.५९ कोटींचा निधी; शहरातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित व सुलभ
यावल.मंडे टु मंडे न्युज |बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. शहरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळण सुरळीत राहण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
यावल शहरातील कि.मी. १७४.१०० ते १८०.६०० या दरम्यानच्या तब्बल ६.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून, या कामासाठी १४ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरांतर्गत विद्यमान रस्त्यांवर वाहतुकीच्या दृष्टीने अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी पाठपुरावा करण्यात आला.
याच अनुषंगाने यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी मिळाली असून, आज या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासोबतच शहरांतर्गत आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे यावल शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच शहरातील व्यापार, दळणवळण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
६.५ किलोमीटरच्या या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर यावल शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे.


