भुसावळच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ११ नगरसेवक शिंदेसेनेत दाखल
मा.नगराध्यक्ष अनिल चौधरी, मा.नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यानंतर नगरसेवकांचाही ‘धनुष्यबाण’ हाती; भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज |भुसावळच्या राजकारणात गुरुवारी रात्री मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बुधवारी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या ११ नगरसेवकांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गुरुवारी रात्री मुंबईतील ‘नंदनवन’ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
या धक्कादायक राजकीय घडामोडीमुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांनीही शिंदेसेनेची वाट धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
संतोष चौधरींच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले ११ नगरसेवक शिंदेसेनेत
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यामध्ये गटनेता व नगरसेवक सचिन संतोष चौधरी (प्रभाग १९ ब), शेख दिलनबाज इक्बाल (प्रभाग १२ अ), उल्हास भीमराव पगारे (प्रभाग २ अ), सुभद्रा गणपत गुंजाळ (प्रभाग १४ ब), अमीन निसार कुरेशी (प्रभाग १५ अ), शेख नसीब बी. शेख नदीम (प्रभाग १५ ब), सचिन भास्कर पटेल (प्रभाग १६ अ), अकिल नादर पिंजारी (प्रभाग १७ अ), शबाना बी. सिकंदर खान (प्रभाग १७ ब), पुष्पा कैलास चौधरी (प्रभाग १९ अ) आणि सुनीता कृष्णा कर (प्रभाग १३ ब) यांचा समावेश आहे.
‘राष्ट्रवादीत न्याय मिळाला नाही’; सचिन चौधरींची भूमिका
शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर गटनेते सचिन चौधरी यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. “राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलो असलो तरी आमच्या प्रभागांमध्ये अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. राष्ट्रवादीत आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही. शहरातील अल्पसंख्याक भागातही अनेक वर्षांपासून विकासकामे झालेली नाहीत. आता शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील. पालिकेतील कथित बोगस कामांची निश्चितपणे चौकशी केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.“पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू,” असेही सचिन चौधरी यांनी स्पष्ट केले.
अनिल चौधरींच्या प्रवेशानंतर राजकीय समीकरणांना वेग
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनिल चौधरी यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर चौधरी यांनीही मुंबईतील ‘नंदनवन’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
चौधरी यांच्या प्रवेशानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने भुसावळच्या राजकारणातील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.
माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळेही शिंदेसेनेत
दरम्यान, भुसावळच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. नगराध्यक्षा पदाच्या अपात्रतेविरोधात त्यांनी दाद मागितली असून, या प्रकरणाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत भंगाळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने या घडामोडीलाही राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.अनिल चौधरी, गायत्री भंगाळे आणि राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांच्या सलग प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून, आगामी काळात याचे पडसाद नगरपालिकेच्या राजकारणात आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर उमटण्याची शक्यता आहे.


