ऐनपूर महाविद्यालयात उद्योजकता व स्टार्टअप संबंधी मार्गदर्शन
ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे महाविद्यालयाच्या नवोपक्रम आणि उद्योजकता विकास सेल (के. आय. ई. डी. सी.) मार्फत उद्योजकता व स्टार्टअप या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाच्या के. सी. आय. आय. एल. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे तसेच कार्यक्रम समन्वयक कु. रोशनी जैन हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या के.आय.ई.डी.सी.चे प्रमुख डॉ. डी. बी. पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महाविद्यालयात असलेल्या उद्योजकता सेल या विषयी माहिती सांगितली. डॉ. खंडारे यांनी आपल्या भाषणात उद्योजकता ही काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे असणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यांनी उद्योजकता व स्टार्टअप यातील फरक समजावून सांगितला व महाविद्यालयातील उदोजकता सेलच्या माध्यमातून आपल्याकडे उदयोगांविषयी काही योजना असल्यास त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. तसेच आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग उभारून परिसरात रोजगार दिला पाहिजे असे सांगितले.
कु. रोशनी जैन यांनी विद्यापीठाच्या के. सी. आय. आय. एल. च्या कार्यप्रक्रिया याविषयी माहिती दिली. मा. प्राचार्य डॉ. अंजने यांनी आजच्या युवकांनी उपलब्ध असलेल्या उद्योजकता विषयी शासकीय योजना व संधी जाणून उद्योजकता ही करिअर निवड केली पाहिजे असे त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.आय.ई.डी.सी.चे समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी मान्यवरांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वैष्णव, प्रा. रेखा पाटील तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

