मुक्ताईनगर मध्ये लाखोंचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये घबराट
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक करून सुमारे 10 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. राहुल गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अर्टिगा (क्रमांक MH-46 Z 1065) या वाहनातून मुक्ताईनगर मार्गे मध्यप्रदेशातील बऱ्हानंपूर येथून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पुरनाड फाटा येथे सापळा रचला.
दरम्यान संशयित वाहन भरधाव वेगात येत असताना थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून खामखेडा गावा जवळ वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला.
वाहन चालकाचे नाव अरबाज नौशाद बेग (वय ३०, रा. काझी हाऊस, खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे असून त्याच्याकडून रजनीगंधा सुगंधित पानमसाला, करमचंद प्रीमियम पान मसाला, मिराज तंबाखू, विमल पान मसाला, पान पराग, जाफराणी जर्दा, अर्टिगा वाहन व मोबाईल फोन असा एकूण 10,19,020 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स.पो.नि. जयेश पाटील, पोउनि निलेश गोसावी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. अवैध गुटखा वाहतूक व विक्रीविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


