भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

बिनविरोध नगरसेवकांचं टेन्शन वाढलं : बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकांच्या निवडीवर टांगती तलवार ! रद्द होणार बिनविरोध निवड?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात महापालिकांच्या निवडणुका होत असून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बिनविरोध झालेल्या नगरसेवकांच्या निवडीवर टांगती तलवार आहे. मतदानाच्या आधीच राज्यभरात जवळपास ६७ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, आता या बिनविरोध निवडींच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांबाबत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन अर्ज मागे घ्यायला लावण्यात आलं आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची विजय घोषणा केली जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘विजयी’ समजले जाणारे उमेदवार आता अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहेत.त्यामुळे बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकांच टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी याआधीच सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले होते.

विरोधकांकडून “आमच्या उमेदवारांवर दबाव टाकून, धमकी देऊन किंवा विविध आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला भाग पाडण्यात आलं,” असे आरोप करण्यात आले होते. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने चौकशीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

यांच्यावर टांगती तलवार!                                      बिनविरोध निवडींमध्ये, भाजप – ४५ उमेदवार बिनविरोध,
शिंदे शिवसेना गटाचे – १९ उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे – २ उमेदवार, मालेगावातील इस्लाम पार्टी – १ उमेदवार, असे असून विशेषतः कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे १५ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं समोर आलं आहे.

रद्द होणार बिनविरोध निवड ?
उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला, का आमिष दाखवण्यात आलं किंवा जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावण्यात आलं हे निवडणूक आयोगाच्या चौकशीत जर सिद्ध झालं तर त्या उमेदवारांची बिनविरोध निवड रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षांसह बिनविरोध निवड झालेले उमेदवार सध्या मोठ्या तणावात आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!