“माझ्या सोबत प्रेम कर, नाहीतर तुझ्या नवऱ्याला व मुलांना ठार मारणार” विवाहितेच्या आत्महत्येचे कारण उघड
यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या दोन दिवसांपूर्वी तरुणाच्या छेडखणीला वैतागून यावल तालुक्यातील किनगाव येथील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना २८ सप्टेंबर च्या रात्री घडली होती. रुपेश राजेंद्र धनगर या तरुणावर या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी वय २८ वर्ष. ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. रुपेश धनगर या तरुणाचा संजय कोळी यांचे घरासमोर गुरांचा गोठा आहे. गुरांच्या देखभालिनिमित्त तो नेहमी गोठ्याकडे रात्री बे रात्री ये – जा करीत असे. केव्हा केव्हा गोठ्यात च झोपतही असे.
दरम्यान गेल्या पाच सहा महिन्यांपासून रुपेश हा मुलगा आपल्या कडे वाईट नजरेने पहात असतो. अशी तक्रार नेहमीच नीलीमाची आपल्या पती व सासू कडे रहात असे. यासंदर्भात संजय कोळी याने रुपेश धनगर याला जाब विचारला असता संजय व रुपेश यांच्या शाब्दिक चकमक व हाणामारी सुद्धा झालीं होती. उपस्थितांच्या मदतीने हा वाद तात्पुरता मिटला होता. व रुपेशचे गोठयाकडे येणेजाणे तात्पुरते बंद झाले होते.संजय कोळी याने बदनामी होवु नये म्हणुन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली नव्हती.
परंतु रुपेश धनगर याने पुन्हा गोठ्याकडे येणे जाणे वाढउन पुन्हा गोठ्यात झोपायला लागला. आणि पुन्हा तोच पूर्वीचा प्रकार सुरू झाला.त्याच्या वाईट नजरेला नीलिमा वैतागली होती.
दरम्यान याच गोष्टीवरून नीलिमा कोळी या घाबरलेल्या होत्या. दि. २७ सप्टेंबर रोजी जेव्हा संजय कोळी कामावरून घरी आले तेव्हा नीलिमा कोळी या घाबरलेल्या दिसल्या. संजय कोळी यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा रुपेश धनगर हा माझ्याकडे घरासमोर चकरा मारून वाईट नजरेने पाहत होता असे तिने सांगितले. त्यावेळेला नीलिमा हिला कुटुंबीयांनी धीर दिला. मात्र मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास काहीतरी पडल्याचा आवाज झाल्यामुळे कुटुंबीय जागे झाले किचनमध्ये जाऊन पाहिले तर नीलिमा कोळी हिने गळफास घेतला होता. ती जीव गुदमरल्यामुळे पाय झटकत होती.
हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली .संजयच्या आईने तिचे पाय वर धरून ठेवले आणि संजय याने विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर तेव्हा तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले.
दरम्यानच्या काळात नीलिमा हिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती अशी…“मी नीलिमा कोळी वैतागून आत्महत्या करीत आहे.याचे कारण असे की, एक मुलगा मला धमक्या देत असे माझ्या सोबत प्रेम कर नाही तर तुझ्या नवऱ्याला व मुलांना जिवे ठार मारणार.रोजच्या धमक्यांना मी कंटाळत मरण घेते.यात माझ्या घरच्या आणि परिवाराचा काहीही दोष नाही. याचा दोषी फक्त रुपेश धनगर आहे.” असा मजकूर नीलिमा ने चिठ्ठीत लिहिला होता. या प्रकरणी मयत नीलिमा कोळी हीचा पती संजय भागवत कोळी यांचे फिर्यादी वरून यावल पोलिस स्टेशनला रुपेश धनगर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा