आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली. या ऐतिहासिक निर्णयाचे मराठी भाषिकांकडून स्वागत केले जात आहे.
ते पुढे म्हणाले की, राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे, हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणे यासाठी काम करत आहे. सध्या गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होत आहे, मात्र यापुढे मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांचे सह राजभाषा समितीचे सदस्य खा. रामचंद्र जांगडा, खा. राजेश वर्मा, खा. कृतिदेवी देवबर्मन, खा. किशोरीलाल शर्मा, खा. सतपाल ब्रह्मचारी, खा, डॉ अजित गोपछडे, खा. विश्वेश्वर हेगडे (कर्नाटक) आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

