भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अपघातजळगाव

जळगावात पुन्हा भीषण अपघात : अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

जळगाव. मंडे टु मंडे न्युज | जळगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, बांभोरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. योगेश महाजन (रा. इच्छादेवी चौक परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी ॲक्टिव्हावरून जात होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.

अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
तरसोद-पाळधी बायपास मार्गाची अवस्था खराब असल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक पुन्हा शहरातून वळविण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा थेट परिणाम वाहतूक सुरक्षिततेवर होत आहे.
शहरातील जुन्या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने धावत असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार अपघात होऊनही या वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणले जात नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी महिलेचा झाला होता मृत्यू
काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ टँकरच्या धडकेत भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही जुन्या महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. आता बांभोरी पुलाजवळ आणखी एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.

शहरातून होणारी अवजड वाहतूक नियंत्रित करावी, खराब झालेला बायपास मार्ग तातडीने दुरुस्त करावा आणि जुन्या महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!