महाराष्ट्रसामाजिक

वट पौर्णिमेचे महत्व, वट पौर्णिमा का केली जाते, वट पौर्णिमा विषयी पौराणिक कथा…

मंडे टु मंडे न्युज | हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.

वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येते. यंदा मंगळवारी, ११ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.वटपौर्णिमा हा सण हिंदू महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा मानला जातो.

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.

निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी  वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी नेसून नये.वटपौर्णिमेच्या दिवशी लाल, पिवळी, हिरव्या रंगाची साडी नेसा. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहेत.

वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे.

या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात.

या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरुन तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाल्या जातात मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. त्यानंतर पाच अर्धे घ्यावीत, मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.

वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!