देशी-विदेशी दारूचा अवैध साठा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्ह्यात देशी विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होऊन विक्री केली जात आहे. जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर जामनेर तालुक्यातील पहूर जवळ नाकाबंदी दरम्यान एका कारमधून १ लाख २५ हजार ४३० रुपये किमतीचा देशी – विदेशी अवैध दारूचा साठा व साडेसहा लाखांची कार असा पावणेआठ लाखांचा मुद्देमाल पहूर पोलिसांनी जप्त केला. हि घटना बुधवार. रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू केली असल्याने पोलिस दलाच्या वतीने सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. या दरम्यान पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पहूर पोलिसांच्या पथकास एमएच २०/इ इ ३०९७ या क्रमांकाचं गाडी छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना संशयास्पद आढळली.
पथकाने कार थांबवून चालक दिलीप अशोक पाटील (धुळे) याची चौकशी करून कारची तपासणी केली. चालकाचे बोलणे संशयास्पद आढळले. कारमध्ये १ लाख २५ हजार ४३० रूपये किमंतीचा देशी-विदेशी दारूचा अवैध साठा कार मध्ये आढळून आला. या मद्यसाठ्यासह साडेसहा लाखांची कार असा ७ लाख ७५ हजार ४३० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबधित चालकाला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक भारत दाते, कर्मचारी गोपाळ माळी, विनोद पाटील ज्ञानेश्वर ढाकरे व हेमंत सोनवणे यांनी केली.