आमचा २५ वर्षांचा संसार मोडला, गिरीश महाजनांचा टोला, जयंत पाटील, नवाब मलिकांचं प्रत्युत्तर
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : नुकताच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. आणि या लग्नसोहळ्यात आजी-माजी मंत्री सर्वच पक्षातील मंत्र्यांनी हजेरी लावली होती. परंतु लग्न सोहळ्यातही एकमेकांना टार्गेट करायची संधी या नेत्यांनी सोडलेली नाही. लग्न सोहळ्यातही एकमेकांना राजकीय टोलेबाजी करताना दिसून आले. सत्ताधाऱ्यांना आधी गिरीश महाजन यांनी टोला लावला, त्यानंतर महाजन यांना राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावरून गिरीश महाजन यांनी आमचा 25 वर्षांचा संसार होता तो तुम्ही मोडला, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील, असंही महाजन म्हणाले. यावेळीही भाजपची सत्तेतून बाहेर राहिल्याची खदखद दिसून आली. त्याला जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनीही तसंच मिश्कील उत्तर दिलंय.
महाजनांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत. गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाजन यांनी आज संसार जुळत असताना, आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे, ते अपशब्द बोलतात. असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपकडून या सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याला तशीच प्रत्युत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली. गुलाबराव पाटलांच्या मुलाचे लग्न जरी कौटुंबीक कार्यक्रम असला तरी तिथे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्यानंतर एकमेकांना टोलेबाजी करायला मात्र विसरले नाहीत.