आ. एकनाथ खडसेंना न्यायालयाने ठोठावला पाचशे रुपयांचा दंड, नेमकं आहे काय प्रकरण?
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल जळगाव न्यायालयाने सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांना पाचशे रुपये दंड केला होता. आज.आ एकनाथ खडसे हे देखील सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने त्यांनाही न्यायालयाने पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोघेही सुनावणीला एकापाठोपाठ गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोघाना पाच-पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
राज्याचे विद्यमान मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१६ मध्ये एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात कोणतेही तथ्य नसताना आपल्यावर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे आपली समाजात प्रतिमा मलिन झाली, बदनामी झाली असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची काल झालेल्या सुनावणी दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने पाचशे रुपये दंड केला होता.
तर आजच्या सुनावणीत मंत्री गुलाबराव पाटील आणि खडसे दोन्ही गैरहजर असले तरी खडसे यांनी उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर असणे आवश्यक होते. मात्र वैद्यकीय कारणास्तव खडसे हे आज सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर न राहता वकिलाच्या मार्फत त्यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी कोर्टाकडे विनंती अर्ज केला. या अर्जाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वकिलांनी ही कोणतीही हरकत घेतली नाही. न्यायालयानेही अर्ज मंजूर करत पुढील सुनावणीची तारीख २७ जून ठेवली असली तरी आज गैरहजर राहिल्याबद्दल एकनाथ खडसे यांना पाचशे रुपये दंड आकारला आहे. काल मंत्री गुलाबराव पाटील यांच्यानंतर आज एकनाथ खडसे यांना ही पाचशे रुपये दंड न्यायालयाने केल्याने राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
नेमकं आहे काय प्रकरण?
एकनाथ खडसे यांनी २०१६ मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला होता. या प्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी कामकाज झाले. यावेळी न्यायालयात एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील हे दोन्ही नेते हजर झाले नाहीत. आज पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर एकनाथ खडसे हे देखील वैद्यकीय कारणास्तव गैरहजर राहिले. त्यामुळे खडसे यांना देखील गैरहजेरीचा खर्च म्हणून ५०० रुपयांचा दंड न्यायालयाने केला आहे. ज्या प्रकारे मंगळवारी गुलाबराव पाटलांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला. त्याचप्रकारे एकनाथ खडसे यांनी देखील वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला. मात्र गैरहजर राहण्याची परवानगी तर मिळाली, मात्र दोघांनाही पाचशे रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.