भाजपात प्रवेश कधी करणार, एकनाथ खडसेंनीच दिलं स्पष्टीकरण
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. पुढील १५ दिवसांमध्ये दिल्लीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत आता स्वतः खडसे यांच्याकडूनच प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली आहे. प्रसार माध्यमांसमोर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे.
तर, येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजपा प्रवेश नाही. माझा भाजपाप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणे येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, असा खुलासा खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.
तसेच, भाजपामध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. पण भाजपामध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे. तुम्ही परत आले तर बरे होईल, अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांमध्ये होती. हे काय आजचे नव्हते. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरू होती, अशी माहिती देखील यावेळी एकनाथ खडसे यांच्याकडून देण्यात आली आहे.