OBC आरक्षणावरून नणंद व भावजय यांच्यात शाब्दिक वार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली असतांना जळगाव जिल्ह्यात देखील आरक्षणाच्या मुद्यावरून ठिणगी पडली आहे. खडसे कुटुंबात नणंद व भावजय यांच्यात यावरून शाब्दिक चकमक झडली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहीणी खडसे यांनी, ‘भाजपाला ओबीसींचा कधीपासून कळवळा यायला लागला’ या आशयाचे ट्वीट केले असता त्यावर खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी, ‘रोहिणी खडसे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने त्यांना पक्षाने सांगितले म्हणून त्या बोलत असाव्यात’, असा टोला लगावला आहे.
राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या नंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. ‘भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही’, असे ट्वीट रोहिणी खडसे यांनी केले. यावरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद-भावजय यांच्यात कलगीतुरा रंगला असल्याचे दिसून येते, नणंद-भावजय एकमेकांसमोर शाब्दिक वाराच्या रुपात उभ्या ठाकल्या.
रोहिणी खडसे यांच्या या टीकेवर एकनाथ खडसेंच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांना विचारले असता रोहिणी खडसे या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना तिकीट मिळालं नसतं, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलं. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचेही खासदार खडसे यांनी सांगितले.