नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेतात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील गोपाल सीताराम पाटील यांच्या शेतात या बिबट्याच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील गोपाल सीताराम पाटील यांच्या गट नंबर ८ या शेतात दी. ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ३ ते ४ वर्षाच्या नर जातीचा बिबट्या दिसल्याची चर्चा गावात पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच दत्ता साबळे, पोलीस पाटील समाधान महाजन, बंडू पाटील, अनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष बिबट्याला जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पाहिले. तर लगेच त्यांनी वनरक्षक अशोक ठोंबरे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी पोहोचले. त्यांनी बिबटयाला मृत घोषित करून बिबट्याच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.
बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचे कारण अद्याप समजले नसले तरी आजारा मुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडून व्यक्त केला गेला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृत बिबट्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी सहाय्यक वनरक्षक उमेश बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल प्रशांत पाटील, प्रसाद भारूडे, वनरक्षक अशोक ठोंबरे, संदीप चौधरी, गणेश खंडारे, सुनील चिंचोले, पशुधन अधिकारी डॉ. योगेश किंगे, डॉ. भारती कुडील, मंगेश टाक, जीवन पाटील, विजय चव्हाण, वसंत शिसोदे, यांच्यासह ग्रा.पं. सदस्य व वन विभागाचे कर्मचारी हजर होते.