आंतराष्ट्रीय

पाकिस्तानमधून आलेल्या कबुतराच रहस्य काय? पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क !

Monday To Monday NewsNetwork।

जयपूर(वृत्तसंस्था)। पाकिस्तानच्या दिशेनं आलेलं एक कबुतर गावातील काहीजणांनी पकडलं तेव्हा त्याच्या पंखांवर एक मोबाईल नंबर लिहिल्याचं ग्रामस्थांना दिसलं. त्याचप्रमाणं त्याच्या पायाला एक छोटी साखळीवजा वस्तू बांधल्याचंही दिसलं. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. ही घटना घडली राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील तेजाणा गावात.

कबूतर सापडल्यावर हालचालींना वेग
बिकानेर हा राजस्थानमधील जिल्हा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यात नेहमीच पाकिस्तानच्या दिशेनं उडत येणारे पक्षी येत असतात, तर भारतातीलही अनेक पक्षी पाकिस्तानकडे जात असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणं ग्रामस्थांनी पाकिस्तानच्या दिशेनं आलेलं एक कबुतर पकडलं आणि त्यावर लिहिलेला मोबाईल नंबर पाहून पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी याची माहिती घेतली असता, हा नंबर पाकिस्तानातील असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून या कबुतराच्या अंगावरील नंबर आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळीमागे काय दडलंय, याचा शोध घेतला जात  आहे.

हे कबुतर पाकिस्तानमधून कुणाकडे आलं होतं, याचा सध्या तपास सुरु आहे. त्याच्या पायाला दिसणारी लोंबती साखळी हा पोलिसांपुढे मोठा प्रश्न आहे. त्याला बांधून कुठली वस्तू भारतात आली का, याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. हे कबुतर बिकानेर परिसरातील एखाद्या नागरिकाचं तर नाही ना, या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कबुतराच्या अंगावर लिहिलेला नंबर पाकिस्तानमधील असल्याने तिथपर्यंत पोहोचणे गुप्तचर यंत्रणांसाठी आव्हानात्मक आहे.
यापूर्वीही अशा प्रकारे अनेक कबुतरं पाकिस्तानमधून भारतात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र यावेळी कबुतरावर लिहिलेला नंबर आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळीमुळे गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!