खिर्डी खु.येथील हायमास्ट लाईट बंद अवस्थेत.ग्रा.पं प्रशासनाने लक्ष द्यावे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथील बलवाडी रस्त्यावर असलेल्या श्रीकृष्ण मंदिर समोर असलेले हाय मास्ट लाईट पोलवर गेल्या वर्षभरापासून एकच लाईट सुरू असून उर्वरित तीन लाईट अद्यापही बंद अवस्थेत आहेत.
या भागात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची वर्दळ सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारितून अन्नाच्या शोधात असलेले साप रात्रीच्या वेळेस रस्त्यावर येत असतात.तसेच मोकाट कुत्री सुध्दा भर रस्त्यात ठाण मांडून बसतात.गावात काही कामानिमित्ताने अबाल वृध्द,लहान मुलांना,व ग्रामस्थांना जावे लागते.रस्त्यावर घनघोर अंधार असल्यामुळे व्यवस्थित रस्ता दिसत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांना किंवा सापाला धक्का लागल्यास कोणाचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण राहील असा प्रश्न ग्रामस्थांना नेहमी पडत असतो.तसेच रात्रीच्या वेळेस गावात भुरट्या चोऱ्या होत असतात अंधाराचा फायदा घेत हे चोर पसार होत असतात.या बाबत वारंवार ग्रामस्थांनी ग्राम पंचायत प्रशासनास माहिती देवून ही जाणून बुजून कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.तसेच या भागातील पथदिवे रात्री बंद दिवसा सुरू असतात या मागे नेमके गुपित काय ? ग्रामस्थ संभ्रमात आहेत. श्रीकृष्ण मंदिर समोरील बंद अवस्थेत असलेले हाय मास्ट लाईट त्वरित दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.