गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात चूल वापरण्याकडे महिलांचा वाढता कल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर मंडे टू मंडे ,प्रतिनिधी। वेळोवेळी होनाऱ्या गॅस दरवाढीमुळे दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्वला याेजनेंतर्गंत गॅस वितरण केले. मात्र गत काही महिन्यापासून गॅसची दरवाढ होत असल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंद असल्याने उज्वला याेजनेचे लाभार्थी व इतर गॅस धारक पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यावर भर देत असल्याचे चित्र दिसत आहे.
उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.परंतु गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. मात्र, चूल पेटविण्यासाठी राॅकेल मिळत नसल्याने सरपण पेटविण्यासाठी महिलांच्या डाेळ्यांतून अश्रूधारा बाहेर पडत आहेत. ग्रामीण भागात जवळपास अनेक कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत हाेते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे आजार हाेतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्यामुळे सर्वांचेच आर्थिक ‘बजेट”कोलमडत आहे.तसेच अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना सरपण गोळा करण्यासाठी रानावनात उन्हात वणवण भटकंती करावी लागते.यामुळे वनसंपदा ही धोक्यात आल्याने वन्यप्राणी सुध्दा मानवी वस्तीत वावरताना दिसतात.तसेच सरपन ओले असल्यामुळे धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या हेतुने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस वाटप करण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ गोरगरिबांची डोकेदुखी ठरत आहे. सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेलेआहेत. उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे.