ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढविण्याची ऐंनपुर खिर्डी परिसरातील प्रवाशांची मागणी
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर एसटीची वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येताना सगळीकडे दिसत आहे.रावेर तालुक्यातील ऐंनपुर खिर्डी गावात मात्र प्रवाशांना तासनतास बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहत बसावे लागत असल्याने प्रवाशांना वैद्यकीय,किंवा काही कामा निमित्त अर्जेंट जाण्याची घाई असते त्या मुळे प्रवाशी अवैध वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा किंवा कालीपिली गाडीने प्रवास करत असतात.तसेच अवैध प्रवासी वाहतूकदार मनमानी पद्धतीने भाडे आकारत असल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
महामंडळाची बस सेवा म्हणजे ग्रामीण भागाला जोडले जाणारे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक बस सेवेमार्फत प्रवास करत असतात. चार ते पाच महिने बस सेवेचा संप सुरु होता. त्यावेळी देखील प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला.अगदी तशीच परिस्थिती रावेर तालुक्यातील अनेक गावात पाहावयास मिळत आहे.तसेच प्रवाशांना रावेर, फैजपूर या ठिकाणी येजा करण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु या बस सेवेला रावेर हून चार फेऱ्या जळगाव हून दोन फेऱ्या सुरू असल्याने प्रवाशांना संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच सध्या
कॉलेज शाळांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास त्या बसने होत नाही. त्यामुळे बस सेवेच्या फेर्या कमी केल्या काय? असा प्रश्न सामान्य प्रवासी विचारत आहेत.
रावेर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील प्रवाशी रावेर येथे कामा संदर्भात ये-जा करत असतात.त्यांना जर बस सेवा उपलब्ध होत नसेल तर, त्यांनी तालुक्याला कसे जावे? असा प्रश्न ते प्रशासनाला विचारत आहे. बसला जर गर्दी नसेल तर, विनाकारण फेऱ्या कशासाठी? असे उत्तर अधिकारी यांच्याकडून देण्यात येत आहे. “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे त्यांनी ही बससेवा पूर्ववत करणे गरजेचे असून बस फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी ऐंनपुर खिर्डी परिसरातील ग्रामस्थ व तालुक्यातील प्रवासी करत आहेत.