निंभोरा ते मोठा वाघोदा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज-भिमराव कोचुरे। रावेर raver तालुक्यातील मोठा वाघोदा येथून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राज्य मार्गाला जोडणारा निंभोरा ते मोठा वाघोदा हा ५ किमी अंतराचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून ठिकठिकाणी अत्यंत खोलगट खड्डे पडले असल्याने व काही ठिकाणी खडी वर निघाली असल्याने अनेक वेळा समोरून वाहन आल्यास खड्डे चुकवितांना मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
या रस्त्यावरून शाळेत व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील कर्मचारी,तसेच परिसरातील शेतकरी वाहन धारकांची नियमित येजा सुरू असते.अनेकांची वाहने या वरून घसरून छोटे मोठे किरकोळ अपघात या रस्त्यावर घडत असतात, खड्यांमधील गिट्टी वरून वाहने घसरून मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न नेहमी वाहन चालकांना पडतो.
या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.खड्यांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजीपूर्वक लक्ष देवून त्वरित खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकर्यांसह वाहन चालकांनी केली आहे.