खाद्य तेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले ,सर्व सामान्य नागरिक झाले त्रस्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। ग्रामीण भागातही तेलाच्या वाढीव किंमतींचा फटका बसत असून शहरातील किरकोळ व ठोक खाद्यतेलांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. यातच ग्रामीण भागात तर किंमतीमध्ये अधिकच वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडून ग्रामीण भागातील किरकोळ किराणा दुकानदार खाद्यतेल विक्रीसाठी आणत असतात. मोठ्या किराणा दुकानावरून हे छोटे व्यापारी प्रति लीटर १७० रुपये खाद्यतेल खरेदी करतात. तर खेड्यापाड्यात २०० रुपये प्रति लीटर खाद्य तेलाची विक्री करीत आहेत. सामान्य ग्राहकांना याचा फटका बसतो. खाद्य तेलाचे भाव हे दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युध्दामुळे भारतातील खाद्य तेलाचे भाव वाढल्याचे संकेत दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेना याचा चांगलाच फटका बसला आहे. सध्या ग्रामीण भागातील जनतेला १९० ते २०० रूपये प्रमाणे खाद्यतेल घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी व गरिब नागरीकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. शेतकऱ्यांना सोयाबिनला किमान ७ हजार भाव मिळाला असता तर त्यांचा फायदा झाला असता. मात्र, आता सोयाबिनचा भाव जरी वाढला असला तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना न मिळता मोठ्या व्यापाऱ्यांना मिळत आहे. तरी राज्य व केंद्र सरकारने खाद्य तेलाचे भाव कमी करण्यात यावे,याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल अशी मागणी ग्रामीण भागातुन केली जात आहे.
दिवसागणिक तेलाच्या दरातील भडका वाढतच चालला आहे.त्यामुळे जे हातावर पोट भरत आहे त्यांनी आपली गरज कशी भागवावी, गोरगरीबाने तेलाऐवजी पाण्याची फोडणी द्यावी का ? हाच खरा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तेलाचे दर कमी होणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागामध्ये काही किराणा दुकानदार दोन पैसे मिळवण्याच्या नादात जास्त भावाने खाद्यतेल विकत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे.