किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून लाँड्री व्यावसायिकाची हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सिगारेट पिताना झालेल्या किरकोळ वादातून आणि शिवीगाळ केल्याच्या रागातून लाँड्री व्यावसायिकाच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील खंडेराव नगरात रेल्वे रुळाच्या बाजूला घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अमर वसंत सपकाळे (४२, रा.खंडेराव नगर) असं असून या प्रकरणात रामानंद नगर पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अमर वसंत सपकाळे हे लाँड्री व्यावसायिक १३ फेब्रुवारी रोजी रात्री घरातून निघाले होते. त्यानंतर १५ रोजी सकाळी रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
आणि तपासा दरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री संशयित दोन आरोपी रेल्वे रुळाजवळ सिगारेट पीत बसले होते. त्याच वेळी अमर सपकाळे तिथे आले. ते दारूच्या नशेत होते. नशेत असलेल्या सपकाळे यांनी आरोपींना काही कारणावरून शिवीगाळ केली. याच रागातून आरोपींनी सपकाळे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केली.
या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. रामानंदनगर पोलीस पथक या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान संशयित आरोपीमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
