जळगावराजकीय

भाजपची जिल्हा बँक निवडणूकिवर बहिष्कार : सर्व उमेदवारांची माघार

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून अचानक भाजपचे निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना पक्षाचे या बॅंकेवर वर्चस्व होते. मात्र खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची ताकद क्षीण झाली. तरीही भाजपला सामावून घेत सर्वपक्षीय पॅनेल करण्याचा प्रयत्न होता. मात्र केंद्रीय तपास संस्थांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याने जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपशी युती न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला. त्यामुळे भाजप येेथे एकाकी पडली.

दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना या पुढाकार घेत एकत्रित पॅनेल तयार केले. एखाद्या जागेसाठीचे मतभेद वगळता तीनही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले. बंडखोरी होण्याची शक्यताही मावळली. त्यामुळे भाजपला येथे चांगले उमेदवार मिळू शकले नाहीत. जे ताकदवान होते अशा खासदार रक्षा खडसेंसारख्या नेत्यांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे भाजपचे या निवडणुकीत पानिपत होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. ही सारी परिस्थिती पाहून भाजपने या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. मात्र महाजन यांनी या बॅंकेत केवळ राजकारण सुरू असून शेतकऱ्यांच्या हिताला काळे फासले जात असल्याचा आरोप करत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपच्या या बहिष्कारामुळे महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!