महाराष्ट्रातील ‘या’ सात जिल्ह्यांचा देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये समावेश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह रुग्णांच्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. यात आता महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश असून पुणे अव्वल स्थानावर कायम असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, मागील आठवड्यात राज्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र, आता यातून नांदेड जिल्ह्याला अंशतः दिलासा मिळाला असून टॉप-१० जिल्ह्यांमधून नांदेडला वगळण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या करोनाचे ८१, ३७८ रुग्ण आहेत. तर, राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद आणि अहमदनगर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबईत ७३२८१, ठाणे ५७६३५, नागपूर ५५९२६, नाशिक ३४५४०, औरंगाबाद १६८१८, आणि अहमदनगरमध्ये १५७१६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.